वाचकः आमच्या पवित्र वडिलांच्या प्रार्थनांद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ता, आमच्या देवा, आम्हावर दया कर. आमेन.
मंडळीः तुला गौरव, आमच्या देवा, तुला गौरव.
हे स्वर्गीय राजा, कैवाऱ्या, सत्याच्या आत्म्या, जो सर्वत्र आहेस व सर्वव्यापी आहेस, आशीर्वादांच्या खजिन्या (कोषा) व जीवनदात्याः हे उत्तमा, ये आणि आम्हामधे वस्ती कर, व सर्व अशुद्धतेपासून आम्हाला शुद्ध कर व आमच्या आत्म्याचे तारण कर.
पवित्र देवा! पवित्र शक्तिमान ! पवित्र अमर्त्या ! आम्हावर दया कर. (३)
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
हे परम पवित्र त्रैका, आम्हावर दया कर. हे प्रभू, आमचे पाप पुसून टाक. हे स्वामी, आमच्या अपराधांची क्षमा कर. हे पवित्रा, आमची भेट घे आणि तुझ्या नावाखातर आमच्या दुर्बलता बऱ्या कर.
प्रभू, दया कर. (३)
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करितो, तसेच तुही आमच्या पराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव.
प्रभू, दया कर. (१२)
या, राजाची आपल्या परमेश्वराची आपण उपासना करू.
या, राजाची आपल्या परमेश्वराची, ख्रिस्ताची आपण उपासना करू व त्याला नतमस्तक होऊ. या, राजाची आपल्या परमेश्वराची, खुदद् ख्रिस्ताची आपण उपासना करू व त्याला नतमस्तक होऊ.
स्तोत्र ९१
जो परात्परच्या गुप्त स्थळी वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो; तोच माझा देव त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पारध्याच्या पाशापासून घटक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल; त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रींच्या समयीचे भय, दिवस सुटणारा बाण, काळोखांत फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूला सहस्रावधि पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही; मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्परला निवासस्थान केले आहे म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरितील. तू सिह व नाग ह्यांच्यावर पाय देऊन चालशील; तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करिन; त्याला माझ्या नांवाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवून. तो माझा धावा करील तेंव्हा मी तुला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहील; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन; त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करिन; त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन.
त्रोपारिओन, स्वर ४ था
नीतिमानांच्या आत्म्यांसह विश्राम दे, हे तारणाऱ्या, तुझ्या निवर्तलेल्या दासाच्या (दासीच्या/दासांच्या) आत्म्याला (आत्म्यांना) व त्याला (तिला/त्यांना) तुझ्या धन्य जीवनात राख, हे मानव प्रियकरा. तुझ्या विश्रामाच्या जागेत, हे प्रभू, जेथे तुझे सर्व संतगण विश्रांत आहेत, तुझ्या दासाच्या (दासीच्या/दासांच्या) आत्म्याला सुद्धा विश्राम दे, कारण केवळ तू मानव प्रियकर आहेस.
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असोः तू परमेश्वर आहेस जो अधोलोकी उतरला व बंधकांच्या बेड्या मोकळ्या (मुक्त) केल्या. हे प्रभू, विश्राम दे, तुझ्या दासाच्या (दासीच्या/दासांच्या) आत्म्याला (आत्म्यांना).
आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेनः हे एकमात्र शुद्ध व निष्कलंक कुमारी, जिने बीज रहित देवाची गर्भधारणा केली? त्या देवाला प्रार्थना कर कि त्याच्या (तिच्या/ त्यांच्या) त्यांच्या आत्म्याचे तारण व्हावे.
काथीस्मा, स्वर ५ वा
हे आमच्या तारणाऱ्या, नीतिमानांसह तुझ्या दासाला (दासीला/दासांना) विश्राम दे आणि जसे कि लिहिले आहे, तुझ्या अंगणात त्याला (तिला/त्यांना) ठेव. आणि तुझ्या चांगुलपणात, हे मानव प्रियकरा त्याची (तिची/त्यांची) पापे, ऐच्छिक किंवा अनैच्छिक, आणि जे सर्व त्यांनी जाणतेपणी किंवा अजाणतेपणी केले, दुर्लक्षित कर.
कोंताकिओन स्वर ४ था
संतांसह विश्राम दे, ख्रिस्ता, तुझ्या दासाच्या (दासीच्या/दासांच्या) आत्म्याला, जेथे कोणतेही कष्ट नाही, शोक नाही, उसासे नाही पण अक्षय जीवन आहे.
मानवाला घडविणारा व निर्माण करणारा केवळ तूच जिरंजीव आहेस. परंतु आम्ही मर्त्य मातीतून घडविलेले होतो आणि मातीतच आम्ही परततो, ज्याप्रमाणे तू आज्ञापिले आणि म्हटले, "तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील," तेथे आम्ही सर्व नश्वर चाललो आहोत, व अंत्यविधी शोकगीतासाठी आम्ही गीत म्हणतोः हालेलूया, हालेलूया, हालेलूया.
मंडळी: हे ईशजननी, सदा धन्य, परम शुध्द आमच्या देवाची आई, तुला धन्यवाद देणे खरोखर योग्य आहे. करूबांपेक्षा आदरणीय आणि सराफांपेक्षा अधिक गौरवी आणि अतुलनीय : मलिन न होता तु देवाच्या शब्दाला जन्म दिला. हे सत्य ईशजननी आम्ही तुझी थोरवी गातो.
मंडळीः पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
मंडळीः प्रभू, दया कर. (३) आशीर्वाद द्या.
वाचकः आमच्या पवित्र वडिलांच्या प्रार्थनांद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ता, आमच्या देवा, आम्हावर दया कर. आमेन.
वाचकः अनंत विश्राम दे, हे प्रभू, धन्य विश्रांतीमध्ये, तुझ्या निवर्तलेल्या दासाच्या (दासीच्या/दासांच्या) आत्म्याला (आत्म्यांना) आणि त्याची (त्यांची) आठवण शाश्वत कर.
वाचकः शाश्वत आठवण (३)
वाचकः त्याचा (त्यांचा) आत्मा उत्तम गोष्टींमध्ये वस्ती करेल आणि त्याची (त्यांची) आठवण युगानुयुग आहे.