सयकळ झपचय आधच पररथन
सयकळ झपचय आधच पररथन

ईसाई ऑर्थोडॉक्स प्रार्थना पुस्तक

सयकळ झपचय आधच पररथन

भारतीय ऑर्थोडॉक्स मंडळी मॉस्को धर्मपीठ / भाषांतरः फादर क्लेमेंट नेहमाय
यह पाठ अन्य भाषाओं में उपलब्ध है:

पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात आमेन.

हे प्रभू येशू ख्रिस्ता, देवाच्या पुत्रा, तुझ्या परम शुद्ध आईच्या, आमच्या पवित्र व देवधर वडिलांच्या आणि सर्व संतांच्या प्रार्थनांखातर, आम्हावर दया कर, आमेन.

तुला गौरव, आमच्या देवा, तुला गौरव.

हे स्वर्गीय राजा, कैवाऱ्या, सत्याच्या आत्म्या, जो सर्वत्र आहेस व सर्वव्यापी आहेस, आशीर्वादांच्या खजिन्या (कोषा) व जीवनदात्याः हे उत्तमा, ये आणि आम्हामधे वस्ती कर, व सर्व अशुद्धतेपासून आम्हाला शुद्ध कर व आमच्या आत्म्याचे तारण कर.

[पास्का ते स्वर्गारोहण समयात "पवित्र देवा, पवित्र शक्तिमान..." ऐवजी पुढे दिलेले पास्काचे त्रोपारीओन तीनदा म्हणावेः मृत्युद्वारे मृत्यूला तुडवून आणि कबरेत असलेल्यांना जीवन देऊन ख्रिस्त मृतांतून उठला आहे. ()]

पवित्र देवा, पवित्र शक्तिमान, पवित्र अमर्त्या, आम्हावर दया कर. ()

पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग, आमेन.

हे परम पवित्र त्रैका, आम्हावर दया कर. हे प्रभू, आमचे पाप पुसून टाक. हे स्वामी, आमच्या अपराधांची क्षमा कर. हे पवित्रा, आमची भेट घे आणि तुझ्या नावाखातर आमच्या दुर्बलता बऱ्या कर.

प्रभू दया कर! ()

पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग, आमेन.

हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जावो, तुझे राज्य येवो. जेसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हांस वाईटापासून सोडीव.

त्रोपारीओनः

आम्हावर दया कर, हे प्रभु, आम्हावर दया कर, सर्व कारणं बाजूला सारून, आम्ही पापीजन तूला, आमच्या स्वामीला, ही विनंती अपर्ण करतो म्हणून आम्हावर दया कर.

पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो.

हे प्रभु, तुझ्यावर आम्ही भरवसा ठेवीला आहे म्हणून आम्हावर दया कर. तू कनवाळू आहेस म्हणून आम्हावर कोधीत होऊ नको, किंवा आमच्या अपराधांची आठवण करू नको तर आम्हांवर अवलोकन कर. तू आमचा देव आहेस आणि आम्ही तूझे लोक आहोत व आम्ही तुझ्या नावाचा धावा करतो म्हणून आमच्या शत्रूपासून आम्हाला सोडीव.

आता आणि सर्वकाळ व युगानुयुग, आमेन.

हे धन्य ईशजननी, आमचा नाश होऊ नये म्हणून तुझ्यावर आशा धरणाऱ्या आम्हांसाठी दयेचे व्दार उघड व तुझ्याव्दारे दुर्भाग्यापासून आमची सुटका होवू दे कारण तू ख्रिस्तीजनांचे तारण आहेस.

प्रभू दया कर! (१२)

प्रार्थना १ लीः संत माकारिअस महानची, देव पित्यालाः

मला ह्या क्षणापर्यंत आणणाऱ्या, हे सनातन देवा, सृष्टीच्या राजा, मी आज कृत्यांद्वारे, शब्दांद्वारे, आणि विचारांद्वारे केलेल्या माझ्या पापांची क्षमा कर आणि देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुध्दतेंपासून, हे प्रभू, माझा दीन जीव शुद्ध कर आणि माझ्या दीन अंथरुणावरून उठून, माझ्या आयुष्याच्या सर्व दिवस मी तुझ्या परम पवित्र नावाची स्तुती करावी आणि माझ्यावर हल्ला करणाऱ्या दैहिक व आत्मिक शत्रूना जिंकावे म्हणून ह्या रात्रीची झोप शांतीमध्ये व्यतीत होऊ दे. आणि मला भ्रष्ट करणाऱ्या व्यर्थ विचारांपासून व वाईट इच्छांपासून, हे प्रभू, माझी सुटका कर. कारण कि राज्य, सामर्थ्य आणि गौरव पित्या, पुत्रा आणि पवित्र आत्म्या, तुझेच आहे, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.

प्रार्थना २ रीः संत अंतीओखस ची, प्रभू येशू खिस्तालाः

हे सर्वाधिपती, पित्याच्या शब्दा, परिपूर्ण येशू ख्रिस्ताः तुझ्या विपुल दये खातर कधीही माझा त्याग करू नको तर सर्वदा माझ्यामध्ये-तुझ्या दासामध्ये राहा. हे येशू, तुझ्या मेंढरांच्या उत्तम मेंढपाळा, भ्रष्टतेचे बीज माझ्यामध्ये आहे म्हणून सर्पाच्या बंडाच्या स्वाधीन मला करू नको व सैतानाच्या इच्छेवर मला सोडू नको तर तूच, हे प्रभू, उपासित परमेश्वरा, पवित्र राजा, येशू ख्रिस्ता, मी झोपलो असतांना अक्षय प्रकाश-ज्याद्वारे तू तुझ्या शिष्यांना पवित्र केले त्या तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे माझे रक्षण कर. हे प्रभू, तुझ्या अयोग्य दासाला मला, माझ्या अंथरुणावर तुझे तारण प्रदान कर. तुझ्या पवित्र शुभवर्तमानाच्या बोधाच्या प्रकाशाद्वारे माझे मन; तुझ्या कृसाच्या प्रेमाद्वारे माझा जीव; तुझ्या शब्दाच्या शुद्धतेद्वारे माझे हृदय; तुझ्या विकाररहित दुःखभोगाद्वारे माझा देह प्रकाशित कर. तुझ्या नम्रतेमध्ये माझे विचार राख आणि तुझ्या गौरवासाठी योग्य वेळी मला उठीव. कारण तुझ्या अनादी पित्यासह आणि परम पवित्र आत्म्यासह, तू युगानुयुग अति गौरवी आहेस. आमेन.

प्रार्थना ३ रीः सीरियाच्या संत एफ्राईम ची, पवित्र आत्म्यालाः

हे प्रभू, स्वर्गीय राजा, कैवाऱ्या, सत्याच्या आत्म्या, करुणा कर आणि मजवर, तुझ्या पापी दासावर दया कर व माझ्या अयोग्यतेपासून मला मुक्त कर आणि मानव म्हणून व केवळ मानव म्हणूनच नाही तर पशूपेक्षाही वाईट म्हणून, माझ्या ऐच्छिक व अनैच्छिक, परिचित व अपरिचित, तारुण्यापासून व दुष्ट सूचनांद्वारे, किंवा निर्लज्जपणामुळे व निराशेमुळे, आज तुझ्याविरुद्ध केलेल्या पापांची मला क्षमा कर. जर तुझ्या नावाने मी शपथ घेतली असेल किंवा माझ्या विचारांमध्ये तुझ्या नावाची निंदा केली असेल किंवा कोणाला दुखविले असेल किंवा कोणत्या गोष्टीसंबंधी क्रोधीत झालो असेल किंवा खोटे बोललो असेल किंवा अनावश्यक झोपलो असेल किंवा माझ्याजवळ आलेल्या भिकाऱ्याला मी झिडकारले असेल किंवा माझ्या बंधूला दुखविले असेल किंवा भांडलो असेल किंवा कोणाचा न्याय केला असेल किंवा मी बढाईखोर किंवा गर्विष्ठ किंवा रागीट असा वागलो असेल; जर प्रार्थनेमध्ये उभे असता ह्या जगाच्या कपटाने किंवा विकृत विचारांनी माझे मन विचलित झाले असेल किंवा मी अत्याधिक खाल्ले असेल किंवा फार पिले असेल किंवा वायफळ हसलो असेल; जर मी वाईट विचार केले असतील किंवा दुसऱ्याची सुंदरता पाहून हृदयात घायाळ झालो असेल; जर अयोग्य गोष्टी बोललो असेल किंवा माझे स्वतःचे अगणित पाप असतां मी माझ्या बंधूंच्या पापाचा उपहास केला असेल; जर प्रार्थनांकडे मी दुर्लक्ष केले असेल किंवा जे मला आठवीत नाही असे आणखी काही वाईट केले असेल; ह्या सर्वांसाठी आणि ह्यापेक्षा अधिक जे मी केले त्यासाठीः हे स्वामी, माझ्या निर्माणकर्त्या, मजवर तुझ्या हताश व अयोग्य दासावर दया कर आणि तू उत्तम व मानव प्रियकर आहेस म्हणून मला मोकळे कर, माफ कर आणि मला क्षमा कर, म्हणजे व्यभिचारी, पापी व उपेक्षणीय असा मी, पडावे, झोपावे व शांतीमध्ये विश्राम करावा. आणि पित्यासह आणि त्याच्या एकुलत्या एक पुत्रासह, तुझ्या परम आदरणीय (परम पूज्य) नावाची मी उपासना करावी, गीत गावे आणि गौरव करावे, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.

प्रार्थना ४ थीः संत माकरिअस महान चीः

हे दानसंपन्न, अमर राजा, हे मानवप्रियकर कनवाळू प्रभू, मी तुला काय अर्पण करावे किंवा कशाने मी तुझी परतफेड करावी? कारण जरी तुला संतोषविण्यात मी सुस्त आहे, आणि काहीही चांगले केले नाही, तरी माझ्या जीवाच्या परिवर्तन व तारणासाठी ह्या गत दिवसाच्या अंतापर्यंत तू माझे नेतृत्व केले आहेस. कोणतेही सत्कृत्य नसलेल्या मज पाप्याशी दयाशील राहा, असंख्य पापांद्वारे भ्रष्ट झालेल्या माझ्या पतित जीवाला उठव आणि ह्या दृश्य जीवनाच्या प्रत्येक वाईट विचाराला माझ्यापासून दूर कर. हे एकमात्र निष्पापा, ह्या दिवशी तुझ्या विरोधात केलेल्या परिचित किंवा अपरिचित, शब्दाने, कृत्याने व विचाराने आणि माझ्या सर्व इंद्रियांद्वारे केलेल्या माझ्या पापांची क्षमा कर. शत्रूच्या प्रत्येक हल्ल्यापासून, तुझ्या दैवी अधिकार, मानवाप्रती अवर्णनीय प्रीती व सामर्थ्याद्वारे तूच माझे रक्षण कर. पुसून टाक, हे देवा, अगणित माझी पापे पुसून टाक. हे प्रभू, प्रसन्न होऊन वाईटाच्या जाळ्यातून मला मुक्त कर व माझा विकारयुक्त (वासनायुक्त) जीव वाचव आणि जेंव्हा तू गौरवाने येशील तेंव्हा तुझ्या मुखप्रकाशाने माझ्यावर छाया कर आणि आता निर्दोष असा, स्वप्नरहित निद्रा मला झोपी जाऊ दे व तुझ्या सेवकाला विचारांपासून त्रासमुक्त ठेव आणि सर्व सैतानी कृत्ये माझ्यापासून दूर कर व मी मृत्यू निद्रा घेऊ नये म्हणून माझ्या हृदयाच्या डोळ्यांना बोधासह प्रकाशित कर. आणि एक शांतिदूत, माझ्या देहाचा व आत्म्याचा रक्षक आणि मार्गदर्शक माझ्याकडे पाठिव जेणेकरून माझ्या शत्रूपासून त्याने मला सोडवावे म्हणजे माझ्या अंथरुणावरून उठून, मी तुला उपकारस्तुतीची प्रार्थना अर्पण करावी. होय, हे प्रभू, इच्छा व विवेकात तुझ्या निर्धन व पापी दासाचे-माझे ऐक; जेंव्हा मी उठेन तेंव्हा तुझ्या शब्दांतून शिकावे असे तू होऊ दे; आणि तुझ्या दूतांद्वारे भुताटकी खिन्नता माझ्यापासून दूर कर; म्हणजे तुझ्या पवित्र नावाला मी धन्यवाद द्यावा आणि जिला तू आम्हा पाप्यांसाठी एक रक्षक म्हणून दिले आणि आम्हासाठी प्रार्थना करणाऱ्या जिचे तू ऐकतोस त्या परम शुद्ध ईशजननी (थेओटोकोस) मरीयेचे गौरव व प्रशंसा करावी. कारण मानवावरील तुझ्या प्रीतीचे सोदाहरन ती दाखविते आणि आम्हासाठी निरंतर प्रार्थना करते हे मी जाणतो. तिच्या रदबदल्यांद्वारे, हे येशू खिस्ता आमच्या परमेश्वरा आणि अमूल्य क्रुसाच्या चिन्हाद्वारे आणि तुझ्या सर्व संतांखातर, माझ्या खिन्न आत्म्याचे संरक्षण कर, कारण तू सर्वकाळ पवित्र व परम गौरवी आहेस. आमेन.

प्रार्थना ५ वीः

हे प्रभू आमच्या देवा, तू उत्तम व मानव प्रियकर आहेस म्हणून, आज शब्दाने, कृत्याने आणि विचाराने केलेल्या माझ्या पापांची मला क्षमा कर. मला शांततापुर्ण व अबाधित झोप प्रदान कर; वाईटापासून माझे रक्षण करण्यासाठी तुझ्या रक्षक दूताला पाठिव. कारण तू आमच्या आत्म्यांचा व देहांचा रक्षक आहेस आणि पित्या, पुत्रा आणि पवित्र आत्म्या तुला आम्ही गैरवितो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.

प्रार्थना ६ वीः

ज्यावर आम्ही विश्वास ठेवितो आणि ज्याच्या नावाचा आम्ही इतर नावांपेक्षा अधिक धावा करितो, हे प्रभू आमच्या देवा, आम्ही झोपी जातांना तू आमच्या आत्म्याला व देहाला आराम प्रदान कर आणि सर्व स्वप्नांपासून व काळ्या आनंदापासून आमचे रक्षण कर; विकारांचा (वासनांचा) भीषण हल्ला थांबव आणि देहात उठणाऱ्या ज्वालेला विझव. तू सर्वदा धन्य आहेस, म्हणून कृत्यांमध्ये व शब्दांमध्ये आम्ही पवित्रतेचे जगावे असे प्रदान कर; म्हणजे सात्विक जीवन व्यतीत करतांना तुझे वचनदत्त आशीर्वाद आम्ही गमावू नये; कारण तू सर्वकाळ गौरवीत आहेस. आमेन.

प्रार्थना ७ वीः संत योहान स्वर्णमुखाचीः

(दिवस-रात्रीच्या तासांप्रमाणे २४ प्रार्थना)

१. हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादांपासून मला वंचित ठेऊ नको.

२. हे प्रभू, सार्वकालिक यातनांपासून माझी सुटका कर.

३. हे प्रभू, मनाने किंवा विचारांनी, शब्दांनी किंवा कृत्यांनी जर मी पाप केले असेल तर मला क्षमा कर.

४. हे प्रभू, अज्ञानता, विसरभोळेपणा, भित्रेपणा आणि कठोर भावशून्यपणापासून माझी सुटका कर.

५. हे प्रभू, सर्व मोहांपासून (परीक्षांपासून) माझी सुटका कर.

६. हे प्रभू, वाईट आकांक्षांद्वारे काळवंडलेल्या माझ्या हृदयाला प्रकाशित कर.

७. हे प्रभू, मणूष्य म्हणून मी पाप केले आहे, पण तू, कनवाळू परमेश्वर म्हणून, माझ्या जीवाची दुर्बलता पाहून, माझ्यावर दया कर.

८. हे प्रभू, तुझ्या पवित्र नावाचे मी गौरव करावे म्हणून तुझी कृपा माझ्या मदतीला पाठिव.

९. हे प्रभू येशू ख्रिस्ता, जीवनाच्या पुस्तकात माझी-तुझ्या दासाची नोंद कर आणि चांगला अंत मला प्रदान कर.

१०. हे प्रभू माझ्या देवा, तुझ्या दृष्टीने मी जरी काहीही चांगले केले नाही तरी तुझ्या कृ पेद्वारे मला चांगली सुरुवात प्रदान कर.

११. हे प्रभू, माझ्या हृदयात तुझ्या कृपेचे दव शिंपड.

१२. हे स्वर्ग-धरेच्या प्रभू, माझी-तुझ्या पातकी, लज्जास्पद व अशुद्ध दासाची, तुझ्या राज्यात आठवण ठेव. आमेन.

१३. हे प्रभू, पश्चतापमध्ये माझा स्वीकार कर.

१४. हे प्रभू, माझा त्याग करू नको.

१५. हे प्रभू, मला परीक्षेत आणू नकोस.

१६. हे प्रभू, चांगले विचार मला प्रदान कर.

१७. हे प्रभू, मला अश्रू, मरणाची आठवण व पश्चाताप प्रदान कर.

१८. हे प्रभू, माझ्या पाप कबुलीचे विचार मला प्रदान कर.

१९. हे प्रभू, मला नम्रता, पवित्रता व आज्ञाधारकता प्रदान कर.

२०. हे प्रभू, मला संयम, धाडस व विनम्रता प्रदान कर.

२१. हे प्रभू, चांगुलपणाचे मूळ, तुझे भय माझ्या हृदयामध्ये रुजव.

२२. हे प्रभू, मी माझ्या संपूर्ण जिवाने व अंतःकरणाने तुझ्यावर प्रीती करावी आणि सर्व गोष्टींमध्ये तुझी इच्छा पूर्ण करावी असे तू होऊ दे.

२३. हे प्रभू, वाईट लोकांपासून, दुरात्म्यांपासून, विकारांपासून (वासनांपासून) आणि इतर सर्व अयोग्य गोष्टींपासून माझे रक्षण कर.

२४. हे प्रभू, मी जाणतो कि तू आपल्या इच्छेप्रमाणे करतोः मज पाप्यामध्येसुद्धा तुझी इच्छा पूर्ण होवो कारण युगानुयुग तू धन्य आहेस. आमेन.

प्रार्थना ८ वीः आपल्या प्रभू येशू खिस्तालाः

हे प्रभू येशू ख्रिस्ता, देवाच्या पुत्रा, तुझ्या परम आदरणीय आईच्या व तुझ्या अपार्थिव (देहहीन) दूतांच्या, तुझा संदेष्टा व अग्रदूत व बाप्तिस्मा करणारा, परमेश्वर प्रेरित प्रेषित, तेजस्वी व विजयी रक्तसाक्षी, पवित्र व देवधर वडील आणि सर्व संतांच्या रदबदल्यांद्वारे, दुरात्म्यांच्या वर्तमान सतावापासून माझी सुटका कर. होय, हे प्रभू, निर्माणकर्त्या, जो पाप्याचे मरण इच्छित नाही तर उलट त्याचे परिवर्तन व्हावे व त्याने जगावे असे इच्छितो, तो तू, मला तुझ्या दीन व अयोग्य दासाला सुद्धा परिवर्तन प्रदान कर; मला गिळण्यास व जिवंत अधोलोकात नेण्यास आतुर असलेल्या प्राणघातक सर्पाच्या मुखापासून माझी सुटका कर. होय, मज हवालदिलासाठी नाशवंत देह धारण करणाऱ्या, हे प्रभू, माझ्या कैवारा, तू मला दीनतेतून बाहेर काढ, आणि माझ्या हवालदिल जीवाला कैवार प्रदान कर. तुझ्या आज्ञा पाळावे व वाईट कृत्ये त्यागावे आणि तुझे आशीर्वाद मिळवावे असे माझ्या हृदयामध्ये घाल. कारण, हे प्रभू तुझ्यावर मी आशा ठेविली आहे, मला तार.

प्रार्थना ९ वीः स्तुदितकर (स्तुदिऊ मठाचे रहिवासी) पेत्राची, परम पवित्र मरियेलाः

तुझ्यापुढे, परम शुद्ध देवाची आई, मी दीन, खाली पडतो व विनवितोः हे राणी, तू जाणतेस, कि मी सतत पापे करतो आणि तुझ्या पुत्राला व माझ्या देवाला क्रोधीत करतो. जरी मी पुष्कळदा पश्चाताप करतो तरी देवापुढे मी खोटारडा असा ठरतो. थरथरत मी पश्चाताप करतो, परमेश्वर मला फटका तर देणार नाही? आणि लवकरच पुन्हा मी तसेच करतो. हे माझ्या स्वामिनी, धनीणी ईशजननी (थेओटोकोस), मी प्रार्थितो, हे जाणून तू मजवर दया कर, मला प्रबळ कर आणि सत्कृत्ये करणे मला शिकिव. तू जाणतेस, माझ्या स्वामिनी ईशजननी, कि माझ्या दुष्कृत्यांचा मी द्वेष करितो आणि पूर्ण अंत:करणाने माझ्या देवाच्या नियमावर प्रीती करितो परंतु माहित नाही का, हे परम शुद्ध स्वामिनी, ज्याचा द्वेष करतो त्यावर प्रीती करतो आणि चांगले ते करीत नाही. हे परम शुद्ध स्वामिनी, माझी इच्छा पूर्ण होऊ देऊ नको कारण ती वाईट आहे तर तुझ्या पुत्राची व माझ्या देवाची इच्छा पूर्ण होवो. तो माझे तारण करो, मला प्रकाशित करो आणि पवित्र आत्म्याची कृपा मला प्रदान करो म्हणजे आतापासून वाईट करणे मी थांबवावे आणि माझे उर्वरित जीवन तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनात जगावे. सर्व गौरव, मान व राज्य त्याचेच आहे, त्याच्या अजन्म्या (अजं) पित्यासह आणि त्याच्या परम पवित्र, उत्तम व जीवनदायी आत्म्यासह, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.

प्रार्थना १० वीः परम पवित्र ईशजननीलाः

हे उत्तम राजाची उत्तम आई, परम शुद्ध व धन्य ईशजननी मरीया, माझ्या विकारवश (व्यथित) जीवावर तुझ्या पुत्राची व आपल्या देवाची दया ओत, आणि माझ्या जीवनाचा उर्वरित समय मी निर्दोष असा घालवावा व तुझ्याद्वारे सुखलोकाची प्राप्ती करावी म्हणून, हे एकमेव शुद्ध व धन्य, कुमारी ईशजननी, तुझ्या रदबदल्यांद्वारे सत्कृत्यांमध्ये माझे मार्गदर्शन कर.

प्रार्थना ११ वीः पवित्र रक्षक देवदूतालाः

हे खिस्ताच्या दूता, माझ्या पवित्र पालका, माझ्या देहाच्या व आत्म्याच्या रक्षका, मी आज केलेल्या सर्व पापांची मला क्षमा कर आणि मी माझ्या देवाला कोणत्याही पापाद्वारे क्रोधीत करू नये म्हणून माझ्या विरोधात येणाऱ्या शत्रूच्या सर्व धूर्ततेपासून माझी सुटका कर. परम पवित्र त्रैकाच्या, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आईच्या आणि सर्व संतांच्या करुणेस व दयेस योग्य असे मला प्रस्तुत करावे म्हणून मज पातकी व अयोग्य सेवकासाठी तू प्रार्थना कर. आमेन.

ईशजननीचे कोंताकिओनः

हे विजेती सरदार, ईशजननी, भयावह संकटांपासून मुक्त केलेल्यांप्रमाणे आम्ही तुझे दास, तुला विजयोत्सव आणि धन्यवाद अर्पण करितो; अजिंक्य सामर्थ्य असल्यामुळे, सर्व संकटांपासून आमची सुटका कर म्हणजे आम्ही तुला गाऊः आनंदित हो, हे अविवाहित वधू!

(दुसरी आवृत्तीः हे ईशजननी, विजयी पुढारी, दुःखातुन सोडविलेल्यांप्रमाणे आम्ही तुझे सेवक तुला विजयाचा आणि धन्यवादाचा सन (उत्सव) अर्पण करतो. तुझे सामर्थ्य अजिंक्य आहे म्हणून सर्व धोक्यांपासून आम्हाला सोडव म्हणजे आम्ही गावे : आनंदीत हो (अभिनंद), हे अविवाहीत वधू!)

परम गौरवी, सदाकुमारी, खिस्त-देवाची माता, तुझ्याद्वारे आमच्या आत्म्याचे तारण व्हावे म्हणून तुझ्या पुत्राला व आपल्या परमेश्वराला आमच्या प्रार्थना सादर कर.

हे ईशमाता, माझी सर्व आशा मी तुझ्यावर ठेवितोः तुझ्या रक्षणामध्ये मला ठेव.

हे कुमारी ईशजननी, तुझ्या मदतीची व मध्यस्तीची गरज असलेल्या मज पाप्याला तुच्छ गणू नकोस तर माझ्यावर दया कर, कारण माझ्या जिवाने तुझ्यावर आशा धरिली आहे.

पिता माझी आशा आहे, पुत्र माझा आश्रय आहे, पवित्र आत्मा माझे रक्षण आहे: हे पवित्र त्रैका, तुला गौरव असो.

हे ईशजननी, सदा धन्य, परम शुद्ध आमच्या देवाची आई, तुला धन्यवाद देणे खरोखर योग्य आहे, करुबांपेक्षा आदरणीय आणि सराफांपेक्षा अधिक गौरवी आणि अतुलनीय, मालिन न होता तू देवाच्या शब्दाला जन्म दिला, सत्य ईशजननी आम्ही तुझी थोरवी गातो.

पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन. प्रभू दया कर. ()

हे प्रभू, आशीर्वाद दे.

समारोपः

[(याजकानेः) हे प्रभू येशू ख्रिस्ता, देवाच्या पुत्रा, तुझ्या परम शुद्ध आईच्या, आमच्या पवित्र व देवधर वडिलांच्या आणि सर्व संतांच्या प्रार्थनाद्वारे, आम्हावर दया कर. आमेन.]

(सामान्य व्यक्तीने म्हणावेः) आमच्या पवित्र वडिलांच्या प्रार्थनांद्वारे, हे प्रभू येशू खिस्ता, आम्हावर दया कर व आम्हास तार. आमेन.

पापक्षमेची प्रार्थनाः

हे देवा, तू उत्तम व मानवप्रियकर आहेस म्हणून, ऐच्छिक व अनैच्छिक, शब्दांनी आणि कृत्यांनी, जाणतेपनी किंवा अजाणतेपनी, दिवसा किंवा रात्री, मनाने किंवा विचारांनी, केलेले आमचे अपराध मुक्त कर, माफ कर, क्षमा कर. सर्वांची आम्हाला क्षमा कर.

मध्यस्थीची प्रार्थनाः

हे मानव प्रियकर प्रभू, आमचा द्वेष करणाऱ्यांना व आम्हाला दुखावणाऱ्यांना क्षमा कर. चांगले करणाऱ्यांशी चांगले कर. आमच्या बंधूंच्या व नातेवाईकांच्या तारणासंबंधीच्या सर्व विनंत्या मान्य कर व सार्वकालिक जीवन त्यांना प्रदान कर. आजाऱ्यांची भेट घे व त्यांना बरे कर. समुद्र प्रवास करणाऱ्यांना मार्गदर्शन कर. प्रवास्यांसोबत प्रवास कर. आमची सेवा करणाऱ्यांना व आम्हावर दया करणाऱ्यांना पाप क्षमा प्रदान कर. ज्यांनी आम्हा अयोग्यांस त्यांच्यासाठी प्रार्थना कारणांची विनंती केली, त्यांवर तुझ्या अपार करुणेनुसार दया कर. हे प्रभू, आम्हा आधी झोपी गेलेल्या आमच्या वाडवडिलांची व बंधूंची आठवण ठेव आणि जेथे तुझा मुखप्रकाश चमकतो तेथे त्यांना विश्राम प्रदान कर. हे प्रभू, आमच्या बंदिस्त बंधूंची आठवण ठेव आणि सर्व दुःखांपासून त्यांची मुक्तता कर. हे प्रभू, तुझ्या मंडळ्यांमध्ये अर्पणे आणणाऱ्यांची व सत्कृत्ये करणाऱ्यांची आठवण ठेव आणि तारणासंबंधीच्या त्यांच्या सर्व विनंत्या मान्य कर व सार्वकालिक जीवन त्यांना प्रदान कर. हे प्रभू, अमची-तुझ्या दीन, पातकी व अपात्र दासांचीसुद्धा आठवण ठेव. तू सदैव धन्य आहेस म्हणून आमच्या परम शुद्ध स्वामिनी, ईशजननी व सदा कुमारी मरीयेच्या आणि सर्व संतांच्या प्रार्थनांद्वारे, तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशाने आमची मने प्रकाशित कर आणि तुझ्या आज्ञेच्या पथावर आमचे नेतृत्व कर. आमेन.

दैनंदिन पापकबुलीची प्रार्थनाः

एका त्रैकात गौरवीत आणि उपासित, माझ्या प्रभू देवा, निर्माणकर्त्या, पित्या, पुत्रा आणि पवित्र आत्म्या, मी तुला कबुली देतोः माझ्या सर्व पापांची जी मी माझ्या जीवनाच्या सर्व दिवस, प्रत्येक तास, वर्तमान वेळेत आणि गत दिवसा व रात्री, कृत्याने, शब्दाने, विचाराने, खादाडपणाने, दारूबाजीने, गुप्त भोजन सेवनाने, मूर्खपणाच्या बोलण्याने, खिन्नतेने, आळशीपणाने, विसंगततेने, आज्ञाभंगाने, (कोणाबद्दल) वाईट बोलून (अफवेने), न्याय करून, दुर्लक्षतेने, स्वार्थाने (स्वप्रितीने), लोभाने (संग्रहवृत्तीने), फसवणुकीने (काही मिळवून)/चोरीने, खोटे बोलून, अप्रामाणिकपणाने, कुतूहलतेने, मत्सराने, हेव्याने, रागाने, वैराने (आपल्यासोबत झालेल्या वाईटाच्या स्मरणाने), द्वेषाने, लाचेने, हावेने आणि माझ्या सर्व इंद्रियांद्वारेः दृष्टीद्वारे, श्रवणाद्वारे, ढुंगण्याद्वारे, चवीद्वारे, स्पर्शाद्वारे पापे केली आहेत आणि माझ्या उर्वरित आत्मिक व दैहिक पापांद्वारे, माझ्या देवा व निर्माणर्त्या, मी तुला क्रोधीत केले आहे आणि माझ्या शेजाऱ्याला दुखविले आहे. ह्यांबद्दल खेद करून, माझ्या परमेश्वरा, मी तुझ्यापुढे दोषी असा उभा आहे परंतु पश्चातापाची मनीषा (इच्छा) माझ्यात आहे. हे प्रभू माझ्या परमेश्वरा, अश्रृंसह दीनतेने मी तुला याचना करितो, फक्त मला साहाय्य करः तू उत्तम व मानव प्रियकर आहेस म्हणून तुझ्या करुणेद्वारे माझ्या गत पापांची क्षमा कर आणि तुझ्या उपस्थितीत नमूद केलेल्या सर्व पापांपासून, (मला) मुक्त कर.

दिमिष्कच्या (दमास्कस) संत योहानाची प्रार्थनाः

अंथरुणाकडे निर्देश करीत म्हणावेः

हे मानव प्रियकर स्वामी, हे अंथरूण माझी शवपेटी होईल काय? अथवा तू माझ्या दुःखी जीवाला (आणखी एका) दिवसाने प्रकाशित करशील? पाहाः माझ्यापुढे शवपेटी पडलेली आहे, माझ्यापुढे मृत्यू उभा आहे! हे प्रभू, मला तुझ्या न्यायाचे व अंतहीन पीडेचे भय आहे तरीहि वाईट करणे मी थांबवित नाही. माझ्या प्रभू देवा तुला आणि तुझ्या परम शुद्ध आईला, सर्व स्वर्गीय सैन्यांना व माझ्या रक्षक दूताला, मी सदैव क्रोधीत करतो. प्रभू, मी जाणतो कि तुझ्या मानव प्रीतिस मी लायक नाही पण प्रत्येक दोषास व यातनेस मी पात्र आहे. तरीही, हे प्रभू, मला हवे असो अथवा नसो, माझे तारण कर! जर नीतिमानास तारशील तर त्यात काही मोठे नाही, जर शुद्धजनांवर (पवित्रांवर) दया करशील तर त्यात आश्चर्यकारक काही नाही कारण ते तुझ्या दयेस पात्र आहेत. परंतु, मज पाप्यावर तुझी अद्भुत दया कर आणि त्याद्वारे तुझी मानव प्रीती प्रकट कर म्हणजे माझ्या दुष्टपणाने तुझ्या अवर्णनीय चांगुलपणावर व दयेवर मात करू नये आणि तुझ्या इच्छेनुसार, माझ्याशी होऊ दे.

अंथरुणावर पडण्याआधी, म्हणावेः

ख्रिस्त परमेश्वरा, मी मृत्यूनिद्रा घेऊ नये आणि “मी त्याच्यावर मात केली आहे” असे माझ्या शत्रूने म्हणू नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर.

पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असोः

हे देवा, पुष्कळ पाशांमधून मी चालतो म्हणून माझ्या आत्म्याचा सहायक हो. हे उत्तमा, त्यांपासून माझी सुटका कर आणि तू मानव प्रियकर आहेस म्हणून माझे तारण कर.

आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.

पवित्र दूतांपेक्षा पवित्र, परम गौरवी ईशमातेला, ईशजननी म्हणून कबूल करत, आपल्या हृदयांनी व मुखांनी निरंतर आपण गाऊया कारण खरोखर आपल्यासाठी तिने देहधारी परमेश्वराला जन्म दिला आणि आपल्या आत्म्यांसाठी अखंड ती प्रार्थना करते.

अमूल्य कृसाला प्रार्थनाः

आपल्या कृसाचे चुंबन घ्यावे. मग अमूल्य क्रुसाला प्रार्थना करीत आपल्या अंथरुणावर कृ साचे चिन्ह करावे:

देवाने उठावे; त्याच्या वैऱ्यांची दाणादाण होवो; त्याचा व्देष करणारे त्याच्यापुढून पळोत. जसा धूर पांगतो तशी त्यांची पांगापांग होवो; जसे मेण अग्नीच्या उपस्थितीत वितळते तशी भुते, देवावर प्रीती करणाऱ्यांच्या उपस्थित आणि स्वतःवर कृसाचे चिन्ह करणाऱ्यांच्या उपस्थित आणि तसेच त्यांच्या उपस्थित नष्ट होवोत जे आनंदाने म्हणतातः आनंदित हो२, परम आदरणीय व जीवनदाई प्रभूच्या कृसा, कारण तुझ्यावर जो खिळला होता त्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने तू भुतांना हाकलून लावतो. तो अधोलोकात गेला आणि सैतानाच्या सामर्थ्याला त्याने चिरडिलें आणि सर्व शत्रूना घालवून देण्यासाठी त्याने आम्हांला तू-त्याचा आदरणीय कृस दिला. हे परम आदरणीय व जीवनदाई प्रभूच्या कृसा, पवित्र स्वामिनी, कुमारी ईशजननी आणि सर्व संतांसह सर्वदा मला साहाय्य कर. आमेन.

किंवा संक्षिप्त रूपातः तुझ्या पवित्र व जीवनदायी कृसाच्या सामर्थ्याद्वारे, हे प्रभू, माझे रक्षण कर आणि सर्व वाईटापासून माझा बचाव कर.

झोपावयास अंथरुणावर पडता तेंव्हा म्हणावेः

प्रभू येशू खिस्ता, हे माझ्या परमेश्वरा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवितो. तूच मला आशीर्वादित कर, तूच मजवर दया कर व सार्वकालिक जीवन मला प्रदान कर. आमेन.

टिप्पणियाँ

  1. हि प्रार्थना व्याकरणात्मक दृष्टीने प्राचीन काव्यात्मक व्यक्तीकरणाच्या शैलीचे उदाहरण आहे. ती प्रत्यक्ष किंवा शब्दशः एखाद्या वस्तूपासून बनलेल्या क्रूसाला उद्देशून म्हटली नसून खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताला केलेली आहे.

  2. प्रणाम


भारतीय ऑर्थोडॉक्स मंडळी मॉस्को धर्मपीठ

भाषांतरः फादर क्लेमेंट नेहमाय

73
उपयोगकर्ता द्वारा प्रकाशित: Rodion Vlasov
सुधारना या जोड़ना चाहते हैं? हमें लिखें: https://t.me/bibleox_live
या स्वयं लेख संपादित करें: संपादित करें